जयपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू असल्याने लाखो स्थलांतरीत कामगार परराज्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांपैकी काही कामगार मिळेल त्या साधनांनी किंवा पायीच आपापल्या घरांकडे परत निघाले आहेत. यामध्ये काही लोकांच्या प्रवासाची कथा ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. मध्य प्रदेशची असणारा एक असाच कामगार जयपूरवरून आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन चक्क सायकलवर आपल्या घराकडे निघाला आहे.
मध्यप्रदेशच्या गुना गावातील रहिवासी असलेल्या महेंद्रने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की तो जयपूरमध्ये कामाला होता. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्याचे काम बंद झाले, आणि कालांतराने घरातील खाण्याचे साहित्य संपल्याने उपासमार होऊ लागली. त्यातच त्याची पत्नी गर्भवती असल्यामुले तिचीही काळजी घेणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने एक सायकल विकत घेतली, आणि आता त्यावरुन तो आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन घराकडे निघाला आहे.