नवी दिल्ली- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्ली ते मुजफ्फपूर हा जवळपास ११०० किलोमीटरचा प्रवास ब्रिजेश कुमार आपल्या कुटुंबासह तीन चाकी सायकल रिक्षातून करत आहे. ब्रिजेशसह त्याच्या कुटुंबीयाशी 'ईटीव्ही भारत'ने गाजियाबादमध्ये बातचित केली.
ब्रिजेश दिवस-रात्र सायकल रिक्षा चालवून आपल्या गावी निघाला आहे. रिक्षाच्या पाठिमागे त्याची पत्नी व दोन मुलं बसलेली आहेत. तो आपल्या संसारउपयोगी साहित्यासह आपल्या गावी निघाला आहे. पत्नी रंगीला ही आपल्या मुलांना ऊनापासून वाचवण्यासाठी विविध उपाय करत आहे. मुलाला ऊन लागू नये, यासाठी मुलाच्या डोक्यावर उशी ठेवत असल्याचे तिनं सांगितलं. याशिवाय जे दुसरं लहान बाळ आहे, त्याला ऊन लागू नये, यासाठी तिने बाळाला पदराखाली झाकून ठेवलं आहे.