पाटणा -लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. बिहारमध्येही इतर राज्यातून अनेक कामगार परतले आहेत. ९ रेल्वेंच्या माध्यमातून जवळपास १० हजार लोक बिहारमध्ये परतले आहेत. मुंबईतून परतलेल्या रामपाल यादव यांनी आपबिती सांगितली. वाईट दिवस आल्यानंतर आमची किंमत कमी झाली. कॉन्ट्रक्टर आणि मालकाने लॉकडाऊनमुळे पगार देण्यास नकार दिला आणि याला विरोध केला म्हणून आम्हाला इमारतीतून धक्के मारत बाहेर हाकलण्यात आले, असे रामपाल यांनी सांगितले.
वास्तविक, दुसऱ्या राज्यांतून बिहारमध्ये आलेले कामगार परत दुसऱ्या राज्यात जाण्यास तयार नाहीत. कामधंदा बंद झाल्याने बचतीचे पैसेही गेले, असे अजमेरहून आपल्या पती आणि तीन वर्षीय मुलासह परतलेल्या उषा देवी सांगत होत्या. सरकार आपल्याला कठीण काळात मदत करेल, असे वाटत होते. मात्र, एकाच व्यक्तिला पुरेसे अन्न तीन जणांसाठी दिले जात होते, असेही उषा यांनी सांगितले.