नवी दिल्ली -लॉकडाऊनच्या काळात परप्रांतात अडकून पडलेल्या मजुरांना परतण्याकरिता सरकारने वाहतुकीची सोय उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात परत जाणारे अनेक मजूर हे आज (रविवारी) सकाळपासून दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील गाजीपूर येथे मोठ्या संख्येने जमा झाले. गावी जाणाऱ्या या मजुरांनी वाहतुकीसाठी बस किंवा रेल्वेची सुविधा घ्यावी, अशा सुचना करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली.
लॉकडाऊन इफेक्ट : दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर परप्रांतीय मजुरांची स्वगृही परतण्यासाठी गर्दी - परप्रांतीय मजुरांसाठी बसची सुविधा बातमी
उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील मिहौली भागात शनिवारी पहाटे झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात २४ जण ठार, तर, काही गंभीररित्या जखमी झाले. या घटनेनंतर, उत्तर प्रदेश प्रशासनाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना परतीच्या मार्गावर पायपीट करत असलेल्या मजुरांकरता बसची सुविधा करण्याचे आदेश दिले. याबाबत माहिती मिळताच आज सकाळपासून दिल्ली-उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथे मोठ्या संख्येने मजुरांनी गर्दी केली.
![लॉकडाऊन इफेक्ट : दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर परप्रांतीय मजुरांची स्वगृही परतण्यासाठी गर्दी Migrant labourers gather at Delhi-Uttar Pradesh border amid lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7231108-170-7231108-1589690245823.jpg)
ते म्हणाले, दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील गाजीपूर येथे आज मोठ्या संख्येने परप्रांतीय प्रवासी जमा झाले आहेत. आम्ही त्यांना बस किंवा रेल्वेने परत जाण्याच्या सूचना करत आहोत. यासोबतच, राज्यात परतण्याकरिता वैध परवाना किंवा पास असणे हे गरजेचे आहे. वैध पासशिवाय कोणालाही राज्यात प्रवेश करण्याची परवानगी नाही, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलीसचे उपनिरीक्षक प्रचंड त्यागी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
दरम्यान, शनिवारी पहाटेच्या उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्यामध्ये ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली होती. या भीषण घटनेत २४ स्थलांतरीत मजूर ठार झाले तर, काही गंभीर जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक कायदा व सुव्यवस्था अधिकारी पीव्ही रामाशास्त्री यांनी सर्व जिल्ह्यातील दंडाधिकाऱ्यांना पायदळी जात असल्याचे निदर्शनास आलेल्या प्रत्येक मजुरासाठी बसची व्यवस्था करण्याबाबतचे निर्देश दिले. या सुचनेनंतर, आज दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील गाजीपूर येथे सकाळपासूनच परप्रांतीयांनी स्वगृही परतण्याकरता गर्दी केली.