नवी दिल्ली -अमेरिकेत स्थाईक असलेले भारतीय शेफ विकास खन्ना लॉकडाऊनमुळे होरपळणाऱ्या स्थलांतरीत मजुरांसह गरजूंना अन्न पुरवण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत 125 शहरांमध्ये 90 लाख लोकांना त्यांनी अन्न पुरविले आहे. सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी किराणा दुकानदार आणि ट्रक चालकांचे एक मोठे जाळे तयार करत गरीब आणि गरजूंना शिजवलेले अन्न आणि किराणा माल देण्याचे काम सुरू केले आहे. शेफ खन्ना यांच्या सहकार्याने उद्या(बुधवार) दिल्लीत 20 लाख लोकांना अन्न पुरविण्यात येणार आहे.
विकास खन्ना हे मुळचे पंजाबमधील अमृतसर येथील आहेत. ते प्रसिद्ध शेफ असून प्रतिष्ठेचा मिशलिन स्टार शेफ हा बहुमान त्यांना मिळाला आहे. मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून ते राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि मुंबईतील माक्झिमस कोलोबज या कंपनीबरोबर मिळून काम करत आहेत. देशातील 125 शहरांमध्ये 90 लाख लोकांना त्यांनी अन्न पुरवले आहे. वाराणसी, बंगळुरू, मंगळुरू, कोलकाता आणि मुंबई सारख्या छोट्या- मोठ्या 125 शहरात त्यांनी गरिबांना अन्न पुरविले आहे.