नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या विविध पॅरामिलिट्री फोर्सेसमधील जवानांना तातडीने परत बोलावले आहे. सुरक्षा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांच्या तैनातीचा आढावा मंत्रालयाने घेतला होता. त्यानंतर सीएपीएफच्या १०० तुकड्यांना त्वरीत आपापल्या पूर्वीच्या ठिकाणी तैनात होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
या एका तुकडीमध्ये साधारणपणे १०० जवान असतात. मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार, सीआरपीएफच्या ४०, बीएसएफ आणि सीआयएसएफच्या प्रत्येकी २० आणि सशस्त्र सीमा बलच्या २० तुकड्यांना काश्मीरमधून आपापल्या आधीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.