डेहराडून - उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्याने हाहाकार माजला होता. अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफची पथके बचावकार्यात जुंपली आहेत. एकूण 600 टीम बचावकार्य करत आहेत. यातच भारतीय हवामान विभागाने आज जोरदार हिमवृष्टीचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून बुलेटीन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आज चमोली जिल्ह्यामधील हिमालयीन भागांमध्ये जोरदार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी जवळपास 15.5 मिमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तपोवनमध्ये महाप्रलय -
सात फेब्रुवारीला उत्तराखंडच्या तपोवनमध्ये महाप्रलय आला होता. या दुर्घटनेत एकूण 206 लोक बेपत्ता झाले होते. यांपैकी 32 लोकांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले असून, अजूनही 170 हून अधिक लोकांचा शोध सुरू आहे. बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक सामान पोहचवण्यात येत आहे. केंद्र सरकार 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तराखंडला सर्व ती मदत करण्यात येत आहे.
चमोलीमधील दुर्घटना ही नवीन बर्फामुळे -
जोशीमठमध्ये झालेली दुर्घटना ही नदीमध्ये नवीन बर्फ आल्यामुळे झाली होती. तपोवन नदीमध्ये आलेला पुरासाठी हिमनग तुटणे नाही, तर नदीमध्ये आलेला नवीन बर्फ जबाबदार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले होते. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाला. हा कित्येक लाख मेट्रिक टन बर्फ नदीमध्ये पडल्यामुळे, नदीच्या प्रवाहाची गती वाढली, ज्यामुळे कित्येक धरणे तुटली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.