नवी दिल्ली - पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) वर भाष्य करणारे एक टि्वट प्रसिद्ध झाले आहे. या टि्वटमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मुफ्ती या नजरकैदेत असल्याने त्यांची मुलगी इल्तिजा ही त्यांचे ट्विटर खाते चालवत आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. त्यावरून इल्तिजाने टि्वट करून 'भारत हा मुस्लिमांना स्थान नसलेला देश' असल्याचे म्हटले आहे.
'चिंदबरम यांची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. मात्र, काश्मीरमधील नेत्यांना विनाकारण तुरुंगवासात ठेवले आहे. काश्मीरमधील नागरिक 5 ऑगस्टपासून बंदिवासातील जीवन जगत आहेत. मला आशा आहे की, चिंदबरम हा मुद्दा सभागृहात मांडतील', असे इल्तिजाने टि्वटमध्ये म्हटले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनआरसी देशभरात लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून विरोधकांकडून शाह यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
५ ऑगस्टला केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर काश्मीरमधील नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून मेहबूबा मुफ्ती,फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनाही ताब्यात ठेवण्यात आले आहे.