नवी दिल्ली- ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश राज्यातील बऱ्याच भागात सायक्लॉन फनी वादळामुळे बरेच नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांच्या परिस्थितीचा तसेच येथे पुरवण्यात येणाऱ्या मदतीचा आढावा घेण्यासाठी रविवारी केंद्रीय कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यातील वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना सिन्हा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सिन्हा यांनी या बैठकीत ओडिशा सरकारशी समन्वय साधण्यासाठी संबंधित केंद्रीय विभागांच्या अधिकाऱयांना निर्देश दिले आहेत. बैठकीत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेतला. तर केंद्रीय मंत्रालय व संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. यावेळी सिन्हा यांनी संबंधित राज्यांच्या प्रशासनासोबत काम करण्याच्या तसेच सर्व आवश्यक मदत त्वरित पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ओडिशातीलस पुरी, खुर्दा आणि भुवनेश्वर मधील बहुतेक रस्त्यांमधून राष्ट्रीय आपत्ती मदत दलाने (एनडीआरएफ) रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केली आहेत या बैठकीत ओडिशा सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रभावित भागात टप्प्या टप्प्यात वीज आणि दूरसंचार सुविधा पुर्ववत केली जात आहेत. भुवनेश्वर आणि पुरीत वीज वितरण प्रणालीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोबाइल सेवा काही प्रमाणात पुर्ववत करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही शहरात रविवारी संध्याकाळपर्यंत ७० टक्के पाणी पुरवठा पुर्ववत केला जाईल. रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या १३८ गाड्यांपैकी ८५ गाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. भुवनेश्वरचा मुख्य रेल्वेमार्ग आता चालू असून पुरी रेल्वे स्थानक चार ते पाच दिवसांत रेल्वे प्रवासासाठी तयार असेल. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरची उड्डाणे शनिवारपर्यंत पुन्हा सुरू होईल, असेही ओडिशा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नागरिकांना अन्नपुरवठा करण्यात आला. ऊर्जा मंत्रालयाने ओडिशाला प्रभावित भागातील वीज सेवा पुर्ववत करण्यासाठी ५०० केव्हीए, २५० केव्हीए आणि १२५ केव्हीए क्षमतेचे डीझल जनरेटर, पॉवर लाइन आणि टावर्स तसेच कर्मचारी दिले आहेत. आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांनी चक्रीवादळ-प्रभावित भागात अतिरिक्त सहाय्य देण्याची विनंती केली आहे.
भारतीय नौदलाकडून मदतकार्य करण्यात येत आहे. ओडिशातीलस पुरी, खुर्दा आणि भुवनेश्वर मधील बहुतेक रस्त्यांमधून राष्ट्रीय आपत्ती मदत दलाने (एनडीआरएफ) रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केली आहेत. त्यामुळे रहदारी पुन्हा सुरू झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने विमान आणि हेलीकॉप्टरच्या सहाय्याने राज्यात औषधे आणि इतर मदत सामग्री पोहचवली आहे. दरम्यान, पुरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आयएनएस 'रणविजय' द्वारे अन्नपदार्थ हेलिकॉप्टमधून पुरवण्यात आले आहेत. तेल आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या सीएसआर निधी अंतर्गत मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.