नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि व्याापरी संबंध तोडल्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० चा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब आहे. यावर पाकने प्रतिक्रिया देण्याचा संबंधच येत नाही. पाकिस्तान जगासमोर विनाकारण कांगावा करून दाखवत आहे. तसेच, भारताशी असलेले द्विपक्षीय संबंध चिंताजनक स्थितीत पोहोचल्याचे चित्र उभे करत आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आर्टिकल ३७० ही आमची अंतर्गत बाब, भारताने पाकला सुनावले खडे बोल
'पाकने उचललेली पावले केवळ जगासमोर भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध बिघडल्याचे चित्र उभे करण्यासाठी आहेत. कारण ही पावले उचलताना पाकने दिलेली कारणे प्रत्यक्षातील परिस्थितीशी मुळीच संबंधित नाहीत. पाकिस्ताने हे निर्णय एकतर्फीच घेतले आहेत,' असे भारताने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरविषयी भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तान बेचैन झाला आहे. पाककडून एकामागोमाग एक भारतविरोधी निर्णय घेतले जात आहेत. पाकमध्ये भारतीय चित्रपटांवरही बंदी आणली आहे. मात्र, 'भारतीय संविधानानुसार, हा भारताचा अंतर्गत विषय होता आणि पुढेही राहील. भारताशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांविषयी चिंताजनक चित्र तयार करून आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा पाकचा कावा कधीही यशस्वी ठरणार नाही,' असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकला ठणकावून सांगितले आहे.
'पाकिस्तानने द्विपक्षीय संबंधांविषयी उचललेल्या पावलांचा भारत सरकार निषेध करत आहे. पाकिस्ताने हे निर्णय एकतर्फीच घेतले आहेत. त्यांनी स्वतःच याचे पुनरावलोकन करून संबंध सामान्य पातळीवर आणण्यासाठी परिस्थिती तयार करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत,' असे भारताने म्हटले आहे.
'पाकने उचललेली पावले केवळ जगासमोर भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध बिघडल्याचे चित्र उभे करण्यासाठी आहेत. कारण ही पावले उचलताना पाकने दिलेली कारणे प्रत्यक्षातील परिस्थितीशी मुळीच संबंधित नाहीत. उलट, भारताने सध्या घेतलेला निर्णय जम्मू-काश्मीरच्या विकासाची धोरणे राबवण्याच्या उद्देशाने आहे. संविधानातील एक तरतूद याच्या आड येत होती. केवळ ती बाजूला करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लैंगिक, सामाजिक, आर्थिक भेदभाव दूर करणे शक्य होईल. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सर्वच लोकांचे जीवनमान उंचावेल,'असे भारताने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरशी संबंधित भारतात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना पाकिस्तानकडून नकारात्मकदृष्ट्या पाहिले जाते, यामध्ये कोणतेच आश्चर्य वाटत नाही. तसेच, पाककडून यासंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या भावनांचा सीमेपलीकडून दहशतवादाची निर्यात करण्यासाठीही वापर केला जातो. तसेच, दहशतवादी कारवायांना योग्य ठरवण्यासाठी स्पष्टीकरणेही दिली जातात.