नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादाबाबत दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक आज पार पडणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान सुरू असलेल्या चर्चेची ही सहावी फेरी असणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील सह-सचिव स्तरावरील एक अधिकारीही उपस्थित असणार आहे. आज सकाळी ११ वाजेपासून, सीमा परिसरातील मोल्दो येथे ही बैठक सुरू होणार आहे.
लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी उपस्थित असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र कोणताही अधिकारी उपस्थित असणार नाही. भारताकडून लष्कराचे प्रतिनिधित्व लेफ्टनंट जनरलर हरेंदर सिंग करणार आहेत. ते लेहमधील १४ कॉर्प्सचे कमांडर आहेत. तर, चीनकडून मेजर-जनरल लिन लिऊ उपस्थित असणार आहेत. ते चीनच्या साऊथ शिनजियँग मिलिट्री डिस्ट्रिक्टचे कमांडर आहेत.