लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन आणि अनलॉकच्या नियमांबाबत सर्व राज्यांसाठी एकच धोरण ठेवल्याबद्दल स्वागत केले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कोरोना संकटात कोणालाही राजकारण करण्याची संधी मिळणार नाही. नागरिकांनी सोयी सुविधा उपलब्ध होतील, असे मायावतींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मायावतींकडून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या लॉकडाऊन-अनलॉक धोरणाचे स्वागत
लॉकडाऊन आणि अनलॉक संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी स्वागत केले आहे. यामुळे नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राज्य सरकारांना कंन्टेन्मेंट बाहेर लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी अनलॉक 4 संबधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अनलॉक 4 मध्ये 7 सप्टेंबर पासून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मेट्रो सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 21 सप्टेंबर पासून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.
देशातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस 30 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, 9 वी ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारची परवानगी घेतल्याशिवाय राज्य सरकारांना कंन्टेन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन करता येणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.