नवी दिल्ली -जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्येही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेला आता 70 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, आतापर्यंत मौलाना सादने शासकीय प्रयोगशाळेतून आपली कोरोना चाचणी केली नाही. चाचणी अहवाल न मिळाल्यामुळे दिल्ली गुन्हे शाखाही मौलाना सादची चौकशी करू शकली नाही.
विशेष म्हणजे, गुन्हे शाखेने याप्रकरणी विदेशी जमातींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. मात्र, गुन्हे शाखा मौलाना सादची चौकशी करण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून दिल्ली पोलिसांनी 2 हजार 362 सदस्यांना बाहेर काढले होते. त्यानंतर 31 मार्चला याप्रकरणाची गुन्हे शाखेने नोंद केली होती. या घटनेला आज 70 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप गुन्हे शाखेकडे मुख्य आरोपी मौलाना साद चौकशीसाठी आलेला नाही.
सुरवातीला मौलाना साद हा 14 दिवसांसाठी क्वारंटाइन आहे, असे त्याच्या वकिलाकडून सांगण्यात आले होते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर गुन्हे शाखेने मौलाना यांना शासकीय प्रयोगशाळेतून कोरोना चाचणी करण्यास सांगितले. मात्र, त्याने खासगी प्रयोगशाळेतून चाचणी केली. त्यावर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा त्यांच्या वकिलाकडून करण्यात आला. मात्र, कोणत्याही खासगी लॅबच्या अहवालावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, असे क्राईम ब्रॅन्चच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मौलाना सादने एम्समध्ये अथवा आरएमएल किंवा सफदरजंग रुग्णालयात जाऊन चाचणी करवून घ्यावी आणि त्याचा रिपोर्ट सादर करावा, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.