नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी, पंतप्रधान मोदी, ओम बिर्ला आदी नेत्यांनी ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नरेंद्र मोदींनी आदरांजली वाहिली आहे.
माजी पंतप्रधान, 'भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन, असे टि्वट करून ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसकडून सोशल मीडियावर '#थँक यू राजीव गांधी' अभियान राबविण्यात येत आहे. राजीव गांधी ही अशी व्यक्ती आहे, ज्यांनी सर्वांत पहिल्यांदा भारताची युवा शक्ती ओळखली आणि देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेले. तरुण व वृद्धांच्या गरजा समजू शकणारे राजीव गांधी सर्वांना प्रिय होते, असेटि्वट काँग्रेसने केले आहे.
राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामातून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला होता. श्रीलंकेतील तामिळ दहशतवाद संपवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. त्याच तामिळ दहशतवाद्यांनी 21 मे, 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे महिला सुसाईड बॉम्बरच्या साहाय्याने राजीव गांधी यांची हत्या केली होती. या हत्याकांडाचा सूत्रधार असलेला प्रभाकरन याचा 2009-10मध्ये श्रीलंकन सैन्याने खात्मा केला होता.