जगदलपूर - (छत्तीसगढ) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना जेवण मिळत नाही, अशा गरजुंना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये देखील एका शहीद जवानाच्या पत्नीने मुख्यमंत्री सहायता निधीत १० हजार रुपयांची मदत केली आहे. राधिका साहू असे या महिलेचे नाव आहे.
राधिका यांचे पती उपेंद्र साहू नक्षली हल्ल्ल्यात शहीद झाले होते. कोरोना विषाणुविरोधातील लढ्यासाठी राधिका यांनी १० हजार रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री भूपेल बघेल यांनीही राधिका यांचे कौतूक केले आहे. १४ मार्चला झालेल्या नक्षली हल्ल्यात राधिका यांचे पती उपेंद्र शहीद झाले.
या घटनेनंतर राधिका त्यांच्या एका बाळासह माहेरी राहत आहेत. त्यांचे पती शहीद झाल्यानंतर सरकारकडून मिळालेल्या राशीतील काही पैसे त्यांनी दान केले आहे. माझे पतीदेखील गरजुंना मदत करायचे, त्यामुळेच मीदेखील काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत दान करण्याचा निर्णय घेतला असे राधिका सांगतात. कोरोनाच्या या संकटात माझ्या मुलासारखे अनेक मुलं आहेत, ज्यांना जेवण मिळत नसल्याने उपाशी राहावे लागत आहे. या पैशातून त्या मुलांपर्यंत अन्न पोहोचले तर ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली असेल, असे राधिका सांगतात.
छत्तीसगढमध्ये शहीद जवानाच्या पत्नीने कोरोनाविरोधातील लढ्यासाठी दान केली रक्कम राधिका जेव्हा त्यांच्या मुलासह बस्तरच्या पोलीस अधिक्षकांजवळ मदत निधी घेऊन गेल्या तेव्हा अधिक्षक दीपक झा यांनी त्यांना समजावले, की हे पैसे दान करण्याऐवजी मुलाच्या खात्यात जमा करा. मात्र, राधिका यांनी पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, की अशी अनेक मुलं आहेत ज्यांना अन्न मिळत नसल्याने ते उपाशी आहेत. त्या मुलांना या पैशातून मदत मिळावी, ही त्यांची इच्छा आहे. बस्तरच्या जिल्हाधिकाराऱ्यांनी राधिका यांनी दिलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत दान केली. त्यांच्या या कर्तृत्वासाठी मुख्यमंत्री भूपेल बघेल यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राधिकाला सॅल्यूट केले आहे.