नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आज (बुधवारी) सुनावणी घेण्यात आली. आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी इंद्रा सहानी केसचा संदर्भ देत मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी मोठे खंडपीठ असावे, असा युक्तिवाद केला. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.
आज झालेल्या सुनावणीत मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, असा युक्तिवाद केला. त्यांनी यासाठी इंद्रा सहानी केसचा दाखला दिला. इंद्रा सहानी प्रकरणात नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. त्यामुळे या प्रश्नावरील सुनावणीसाठी मोठे खंडपीठ हवे, असे रोहतगी म्हणाले.
मराठा आरक्षणाची सुनावणी 11 न्यायमूर्तींंच्या खंडपीठासमोर करण्यात यावी, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या राज्यांची यादी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडली. आरक्षण देण्यावरील 50 टक्क्यांची मर्यादा कोणत्या तत्वावर घालण्यात आली आहे, अशी बाजू याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावतीने नरसिंह यांनी मांडली. 50 टक्क्यांच्या मर्यादेचा फेरविचार व्हावा, असाही युक्तिवाद नरसिंह यांनी केला.
मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनी भक्कमपणे बाजू मांडली. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असून, त्यावेळी राज्य शासनाचे दुसरे वकिल परमजितसिंग पटवालिया युक्तिवाद करतील, असे ट्विट मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.