मुजफ्फरपूर -बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात चमकी तापाचा कहर सुरुच आहे. यावरुन उच्च न्यायालयाने बिहार सरकारला खडे बोल सुनावले आहेत. चमकी आजार पीडित मुलांच्या उपचारासाठी आणि चमकी महामारीला आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत. यासंबधीत अहवाल येत्या सात दिवसात न्यायालयात दाखल करण्यास सांगितला आहे.
चमकी महामारीने मृत्यू झालेल्या मुलांची संख्या १८० वर पोहोचली आहे. तर आणखी मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या महामारीपासून रविवारी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
न्यायाधीश संजिव खन्ना आणि न्यायाधीश भूषण रामाकृष्णा गवई यांच्या खंडपीठाने बिहार सरकारला राज्यातील पोषण व स्वच्छता व वैद्यकीय सुविधासंबधी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. न्यायालयात 10 दिवसानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
काय आहे चमकी ताप?
अॅक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम अशी या रोगाची व्याख्या केली आहे. त्याचा अर्थ विषाणू, जिवाणू, बुरशी, परोपजीवी, रासायनिक विषे यातून येणारा ताप असा आहे. वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विषाणू तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. टी. जे.जॉन यांच्या मते या संज्ञेला काही अर्थ नाही कारण अशा पद्धतीने कोणताही मेंदूविकार यात बसवता येईल. त्यांच्या मते यात वेगवेगळे रोग येतात. त्यात एन्सेफलायटिस, मेनिंजायटिस, एन्सेफलोपॅथी, सेरेब्रल मलेरिया यांचा समावेश होता पण अधिक अचूक व्याख्येची गरज आहे.