महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले?'

मागील दहा वर्षांमध्ये काँग्रेसने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे बँका डबघाईला आल्या आहेत, असा आरोप भाजप करत आहे. मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले हे ते का सांगत नाहीत? असा सवाल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Manmohan Singh Press conference

By

Published : Oct 17, 2019, 3:19 PM IST

Updated : Oct 17, 2019, 5:43 PM IST

मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. मुंबई काँग्रेसने या परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती, कलम ३७०, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे, तसेच बँकांचे डबघाईला येणे अशा विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली.

गाजावाजा करत सुटलेले भाजपचे 'डबल इंजिन' हे निव्वळ अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या एकदम वाईट स्थितीमध्ये आहे. महाराष्ट्रातील उत्पादन वाढीचा दर हा गेली चार वर्षे घसरतच चालला आहे, असे मत सिंग यांनी व्यक्त केले. पीएमसी बँकेबाबत बोलताना ते म्हणाले, की १६ लाख खातेदारांना या प्रकरणाचा फटका बसला आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरबीआय आणि महाराष्ट्र सरकारने एकत्र येऊन याबाबत ठोस निर्णय घ्यावा. तर, मागील दहा वर्षांमध्ये काँग्रेसने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे बँका डबघाईला आल्या आहेत, असा आरोप भाजप करत आहे. मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले हे ते का सांगत नाहीत? असा सवाल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे.

कलम ३७०बाबत काँग्रेसची भूमीका स्पष्ट करताना ते म्हणाले, की याबाबत निर्णय घेतला जात असताना काँग्रेसने कलम हटवण्याच्या समर्थनार्थ मत दिले होते. मात्र, ज्या पद्धतीने हे सर्व घडवून आणले गेले, त्याला काँग्रेसचा विरोध होता. कलम ३७० लागू करणे हा मुळात तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय होता. त्यामुळे त्यात बदल होणे अपेक्षित होते, मात्र जम्मू आणि काश्मीरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन, त्यानुसार हा निर्णय घ्यायला हवा होता.
सावरकरांबाबत बोलताना ते म्हणाले, की सावरकरांच्या सन्मानार्थ इंदिरा गांधींनी टपाल तिकीट छापले होते. त्यामुळे आमचा सावरकरांना विरोध नाही हे स्पष्ट होते. मात्र, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांना आमचे समर्थन नाही.

तर, भारत आणि चीनदरम्यान झालेल्या दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेमध्ये नेमक्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली नाही. मग, या परिषदेचा फायदा काय? असेही ते म्हणाले.

हेही वाचा :PMC बँक घोटाळा : खातेदारांचे शिष्टमंडळ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मुंबईत भेटणार

Last Updated : Oct 17, 2019, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details