नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे नुकताच कामगार विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी काल(मंगळवार) शहरातील पुष्प विहार भागातील कामगार कार्यालयाला अचानक भेट दिली. येथील कामातील ढिसाळपणा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कार्यालयात सरकारी कामासाठी ताटकळत बसलेल्या कामगारांशीही त्यांनी चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या अचानक भेटीने अधिकाऱ्यांना घाम पुटला होता.
उपमुख्यमंत्र्यांची भेट फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आली होती. त्यांनी कार्यालयाबाहेर रांगेत ताटकळत उभे राहिलेल्या कामगारांशी आपूलकीने चर्चा केली. त्यांच्या अडचणी ऐकूण घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांना कामातील निष्काळजीपणा आणि अनियोजनावरून धारेवर धरले. अधिकाऱ्यांना जाब विचारताना सिसोदिया व्हिडिओत दिसत आहेत.
कार्यालयातील चुकीच्या कारभारावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. याआधी कार्यालयाला नियमासंबंधीत सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले, ही गांभीर्याची गोष्ट आहे. कामगारांच्या कल्याणाबाबत दिल्ली सराकर निष्काळजीपणा आणि कारणे खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.