इम्फाळ -मनिपूर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक(कायदा-सुव्यवस्था) अरविंद कुमार यांनी आपल्या कार्यालयात बसलेले असताना स्वत:वर गोळी झाडून घेतली. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
अरविंद कुमार हे 1992 च्या तुकडीतील बिहार केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्यांनी गोळी झाडून घेतली. पोलीस मुख्यालयातील 2 मनिपूर रायफल्स कॉम्पलेक्समधील आपल्या कक्षात बसले असताना ही घटना घडली. यानंतर त्यांना तत्काळ इम्फाळमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.