लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण करण्यात होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हा हाजी कादीर नावाच्या एका व्यक्तीने त्यांचे प्राण वाचवले होते. २० डिसेंबरला फिरोजाबादमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना काल (गुरुवार) प्रकाशात आली आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलने होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले होते. फिरोजाबादमध्येही अशाच एका हिंसक आंदोलनात, २० डिसेंबरला अजय कुमार या पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून मारहाण करण्यात येत होती. यामध्ये त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा हाजी कादीर या व्यक्तीने, त्यांना जमावापासून वाचवत आपल्या घरी नेले, आणि परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन सोडले.
हाजी कादीर यांनी मला त्यांच्या घरी नेले. माझ्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली होती. त्यांनी मला पाणी दिले, आणि स्वतःकडील कपडे मला घालण्यास दिले. मी त्यांच्या घरात सुरक्षित असल्याची खात्रीही त्यांनी मला दिली. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर त्यांनी मला पोलीस ठाण्यात नेऊन सोडले, अशी माहिती कुमार यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की हाजी एका देवदूताप्रमाणे तिथे आले. ते आले नसते, तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो.