कोलकाता - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी एका युवकाला पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातून अटक करण्यात आली आहे. हा युवक कंगना रणौतचा चाहता असल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील टोलेगुनगे भागातून त्याला अटक करण्यात आली.
कंगनाच्या चाहत्याची संजय राऊत यांना धमकी; पश्चिम बंगालमधून अटक - कंगना चाहत्याची संजय राऊत यांना धमकी
गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी एका युवकाने सोशल मीडियावरून खासदार संजय राऊत यांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. आज या युवकाला पोलिसांनी कोलकात्यातून अटक केली.
कोलकाता आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पलाश घोष नामक (२०) आरोपीला अटक केली. पलाश हा जीम ट्रेनर असल्याचे समजले आहे. संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी त्याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. या युवकाने सोशल मीडियावरून खासदार संजय राऊत यांना 'गंभीर परिणाम भोगावे लागतील,' अशी धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असून मुंबई पोलीस आरोपीचे हस्तांतर करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कंगना रणौतने ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर कंगना मुंबईत आल्यावर शिवसेनेच्या रणरागिणी तिला सोडणार नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केले होते. मुंबईतील कंगनाच्या मणिकर्णिका कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे म्हणत महानगरपालिकेने कारवाई केली. यात कार्यालय जेसीबीने तोडण्यात आले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षाही पुरविली आहे. खासदार संजय राऊत यांनीही कंगना रणौतबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.