मल्लापुरम(केरळ) - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे देशभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. शक्य होईल, तसे ऑनलाईन क्लास घेण्याचा प्रयत्न शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी घेणारे शिक्षक करत आहे. मात्र, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप या सर्व सुविधा सगळ्यांकडेच आहेत असे नाही. केरळमध्ये तर राहीज आणि रमीझा या दोन विद्यार्थ्यांच्या घरी दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच वीज आली आहे. त्यामुळे त्यांना आता ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य होणार आहे.
राहीज आणि रमीझा यांचे घर केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील अथालूर या खेडेगावात आहे. घरी वीज आल्यानंतर या दोघांमधे उत्साह संचारला आहे. कोरोनामुळे अनेक दिवसांपासून घरीच असल्यामुळे शिक्षण घेता येत नव्हते. मात्र, आता ऑनलाईन क्लास सुरू करण्यासाठी दोघेही आनंदीत आहेत. वीज नसल्याने दोघेही मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायचे. मात्र, आता आम्हाला ऑनलाईन क्लास करता येतील, असे राहीज आणि रमीझा यांनी सांगितले.
याआधी वीजेसाठी आम्ही अनेक पक्षाच्या लोक प्रतिनिधिंच्या घरी फेऱ्या मारल्या. मात्र, सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. आता कोरोनामुळे आमची समस्या चव्हाट्यावर आली. शाळा बंद असल्याने ऑनलाईन क्लास घेण्यात येतात. टीव्ही चॅनलवरही शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येतात, ते आमच्या मुलांना मिळेल, असे कुटुंबीय म्हणाले.
घराजवळ वीजेचा खांब उभारावा म्हणून अधिकाऱ्यांकडेही खूप वेळा गेलो. मात्र, कोणाही मदत केली नाही. असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे वडील अब्दुल रहमान म्हणाले, मागील दहा वर्षांपासून आमच्या घरात काळाकुट्ट अंधार होता. वीजेचे काम केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीचे सदस्य के. शिवरामन यांच्यामुळे शक्य झाले. शिवरामन यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत जाऊन अब्दुलरहमान यांच्या घरची बिकट परिस्थिती पाहिली.
शिवरामन यांनी आमच्या घरी येऊन आमची चौकशी केली. घरामध्ये वीज का नाही, असेही त्यांनी विचारले. त्यानंतर वीज देण्यासाठी त्यांनी सर्वकाही व्यवस्था केली. एका दिवसात घरापर्यंत वीज आणण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच घरी वीज आल्याचे अब्दुलरहमान म्हणाले.