भोपाळ - विशाखापट्टनम येथील कारखान्यातील वायू गळती ताजी असतानाच काल (शुक्रवार) मध्यप्रदेशात वायू गळतीची घटना समोर आली आहे. मात्र, रल्वे विभागाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या ३२ टँकरमधून (LPG) एलपीजी गॅस कर्नाटकाहून भोपाळला आणण्यात येत होता. मात्र, खंडवा शहराजवळ वायू गळती समोर आल्याने अनर्थ टळला. एका टँकरमध्ये सुमारे ४० टन गॅस भरलेला होता. वायूगळतीनंतर जर काही दूर्घटना झाली असती तर खंडवा शहरात हाहाकार माजला असता.
कर्नाटकहून मालवाहू रेल्वे भोपाळ जवळील बकानिया एलपीजी गॅस डेपो येथे चालली होती. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रेल्वे खंडवा स्टेशनवर थांबली. त्यावेळी गाडीच्या एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे समोर आले. काल सायंकाळी पाच वाजल्यापासून पुढील सात तास एका टँकरच्या स्लायडरमधून गॅस गळती होत होती.