नवी दिल्ली - गलवान नदी खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या भीषण झटापटीनंतर, सलग तीन दिवस लष्कराच्या उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. गुरूवारी या बैठकांचा शेवट झाल्याची माहिती ईटीव्ही भारतच्या सूत्रांनी दिली आहे. या बैठका मेजर-जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये होत होत्या.
गुरूवारी सकाळी सुरू झालेली चर्चा दुपारच्या सुमारास संपली. त्यानंतर पुढील चर्चा कधी होणार आहे, किंवा डिव्हिजनल कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे, की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. कदाचित आता लष्करी स्तरावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे एका सूत्राने सांगितले.
दोन्ही सैन्यांदरम्यान होत असलेल्या झटापटींच्या पार्श्वभूमीवर, लष्करी स्तरावरील चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. या चर्चा डी-एक्सेलेटरी प्रोसेसचा भाग होत्या. यामध्ये मग ४-५ मे रोजी लडाखच्या पांगाँग तलावाजवळ, आणि १० मे रोजी सिक्कीमजवळ झालेल्या सैनिकांमधील झटापटीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यामध्ये झालेली झटापट ही सर्वात भीषण आणि क्रूर ठरली.
सोमवारी रात्री ज्याठिकाणी झटापट झाली, त्याच पेट्रोल पॉइंट १४वर पुढील तीन बैठका पार पडल्या. या चौकीची जागा आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळेच भारत आणि चीन दोन्ही देशांच्या सैन्याला या जागेमध्ये रुची आहे. ही जागा उंचावर आहे, आणि खालून गलवान नदी वाहत जाते. सोमवारी झालेल्या झटापटीमध्ये काही सैनिक या नदीमध्ये पडून वाहून गेल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.