महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधी १५० : गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले देशोदेशींचे 'गांधी' - गांधी १५०

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, आपण गांधीजी आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या लेखामध्ये आपण गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या देशोदेशींच्या नेत्यांबद्दल, आणि विविध अहिंसावादी आंदोलनांबद्दल जाणून घेणार आहोत. हा लेख डॉ. नीता खांडपेकर यांनी लिहिला आहेत. त्या मुंबई विद्यापिठामध्ये प्राध्यापिका आहेत.

गांधी १५०

By

Published : Sep 24, 2019, 5:00 AM IST

मुंबई - जगातील सर्व खंडांमधील अनेक मोठे नेते, ज्यांमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या नेत्यांचाही समावेश आहे, अशा अनेक नेत्यांना गांधीवादी विचारांमधून प्रेरणा मिळाली. यामध्ये मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर, दलाई लामा, नेल्सन मंडेला, अॅडोल्फो पेरेज एस्किवेल अशा नेत्यांचा समावेश होतो. नेल्सन मंडेला आणि देसमंड टुटु यांनी दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना, हिंसक आंदोलन मागे घेण्याची मागणी करत, तुलनेने शांततेत आंदोलन करून मतदानाचा अधिकार मिळवून दिला होता. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांना तर लोक 'अमेरिकन गांधी' म्हणत. त्यांच्या 'पिलग्रिमेज टू नॉनव्हॉयलंस' (अहिंसेची तीर्थयात्रा) या पुस्तकात ते लिहितात, 'मी गांधींच्या तत्वज्ञानाचे सखोल परीक्षण केल्यावर, प्रेमाच्या सामर्थ्याविषयी माझा संशय हळूहळू कमी होत गेला आणि मी प्रथमच पाहिले की ख्रिश्चन धर्मातील प्रेमाची शिकवण, गांधींच्या अहिंसावादी पद्धतीने वापरली गेल्यास, दबल्या गेलेल्या लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी एक मोठे शस्त्र ठरेल'. ख्रिस्ती लोकांवर गांधीजींच्या धर्माचरणाचा बराच प्रभाव पडला. स्टॅनली जोन्स, हेन्री रोसर, डॉ. कॉर्मन, डब्ल्यू. डब्ल्यू. पिअर्सन आणि 'दीनबंधू' सी. एफ. अँड्र्यूज हे गांधीजींपासून प्रेरित झालेले काही ख्रिश्चन लोक.

हेही वाचा : गांधी १५० : गांधी, आझाद अन् गफ्फार खान यांनी पाहिले होते अखंड भारताचे स्वप्न

अहिंसावादी आंदोलनाने अनेक ठिकाणी विजय मिळवल्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या नेतृत्वाखाली १९६० साली झालेल्या, अमेरिकी नागरी अधिकार आंदोलनाने अफ्रिकन-अमेरिकींना राजकीय अधिकार मिळवून दिले. पूर्व युरोपातदेखील, पोलंडमधील एकता आणि झेकोस्लोव्हाकिया मधील चार्टर ७७ या समूहांनी केलेल्या अहिंसावादी आंदोलनांमुळे कम्युनिजमचा पाडाव झाला होता. १९६८ मध्ये, लोकांच्या एकत्र येण्याने फिलिपिन्सचा हुकुमशाह फर्डिनांड मार्कोसच्या हुकुमशाहीचा अंत झाला. लष्कराला आदेश मिळाल्यानंतरही त्यांनी लोकांवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यानंतर, टँक्सची देखभाल करणाऱ्या सैनिकांना मुलींनी गुलाब दिल्याची छायाचित्रे अजूनही लोकशाही चळवळीची आठवण करून देतात.

लांझा डेल वास्तो हे ख्रिश्चन विचारक होते. १९३७ मध्ये वर्ध्याला येऊन त्यांनी गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी त्यांना 'शांतीदास' असे नाव दिले होते. त्यानंतर, १९५७ला देन वास्तो हे फ्रान्सला परत गेले, आणि तेथील राजकारणात सक्रिय झाले. फ्रान्सच्या लोकांकडून अल्जेरियन लोकांना दिल्या जात असणाऱ्या त्रासाविरोधात त्यांनी २० दिवस उपोषण केले.

हेही वाचा : आजची बेरोजगारी आणि गांधीवादी अर्थशास्त्राची गरज

पॅलेस्टाईनमधील प्राध्यापक एडवर्ड सेड हे 'गाझाचे गांधी' म्हणून प्रसिद्ध होते. दक्षिण आफ्रिकेमधील डर्बन स्ट्रीटला गांधीजींचे नाव देण्यात आले आहे. १९७० मध्ये संपूर्ण लॅटिन अमेरिकेतील नागरी हक्क आंदोलनाला हिंसक वळण लागले होते, तेव्हा एस्किवेल यांनी शांततेचा मार्ग दाखवत या चळवळीला अहिंसेचा मार्ग स्वीकारण्यास प्रेरित केले. २००५ साली, लॉस अँजेलिस, अटलांटा आणि अमेरिकेतील इतर काही शहरांमध्ये चरख्यावर काम करत असलेले गांधीजींचे छायाचित्र सगळीकडे लावण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. अटलांटामधील प्राध्यापक वॉल्टर अर्ल फ्लूकर हे म्हणतात की जगाला अहिंसा शिकवण्यात गांधीजींचा मोठा वाटा आहे. १९३० साली, वर्तमानपत्रांमधील मथळ्यांमध्ये सर्वात जास्त वेळा आल्यामुळे गांधीजींना अमेरिकेतील 'मॅन ऑफ द इअर' पुरस्कार देण्यात आला होता. 'अ स्टडी ऑफ मीनिंग ऑफ नॉन-व्हॉयलंस' (अहिंसेच्या अर्थाचा अभ्यास) या आपल्या पुस्तकात जीन शार्प लिहितात, की १९५९ साली 'अहिंसा', 'अहिंसक प्रतिकार', 'सत्याग्रह' आणि 'शांतता' हे अमेरिकेच्या 'द न्यूयॉर्क टाईम्स', 'द टाईम्स' आणि 'द मँचेस्टर गार्डियन' या वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक वापरले गेलेले शब्द होते.

हेही वाचा : आधुनिक प्रबोधनाचे नवे मार्ग शोधताना : गांधी आणि टागोर

१९५५-५६ च्या दरम्यान, मॉन्टगोमेरी मधील कृष्णवर्णीय लोकांनी अहिंसक मार्गाने आंदोलन करत, वर्षभर बस वापरावर बहिष्कार टाकला होता. सिसिलियामधील भुकेल्यांना अहिंसक आंदोलनाचा मार्ग दाखवल्याबद्दल डॅनिलो डोल्सी यांना तुरुंगात जावे लागले होते. वेल्स देशातील राष्ट्रवादी लोकांनीही सरकारला प्रतिकार करण्यासाठी अहिंसावादी मार्गाचा अवलंब केला होता. 'परमाणू प्रतिबंधकांना पर्याय : अहिंसक प्रतिकार' या आशयाचे भाषण कमांडर सर स्टीफन किंग-हॉल यांनी ब्रिटीश सैन्याच्या तीनही दलांसमोर केले होते. हंगेरी देशातील बुडापेस्टमधील महिलांनी रशियन टँक्ससमोर झोपून आंदोलन करत, त्यांना अडवले होते. ज्युलिअस न्येरेरे, टांझानियामधील एक नेते ज्यांच्यावर गांधीजींचा भरपूर प्रभाव पडला होता. ज्यामुळे त्यांनी टांगांयिकाच्या आंदोलनामध्ये वंशभेदाविरोधात बाजू मांडली. अमिनू कानो या गांधीजींच्या मुस्लीम अनुयायाने गांधीजींच्या अहिंसावादाचा अभ्यास करून उत्तर नायजेरियामध्ये त्यांचा अवलंब आणि प्रसार केला.

पाश्चिमात्त्य जीवनशैलीचे अनुकरण केल्यामुळे आपल्याकडे हजारो वर्षांपासून असलेली कुटुंब आणि मूल्य व्यवस्था धोक्यात आली आहे. मात्र, आता हळूहळू का होईना, पण जनरेशन 'एक्स' ही मान्य करत आहे, की हिंसेने तडा घातलेल्या या समकालीन जगाला गांधीजींच्या विचारांची गरज आहे. आजच्या गोंधळलेल्या जगात, शांतता आणि एकोपा घडवून आणण्यासाठी एक दिशा देण्याचे सामर्थ्य हे केवळ गांधींच्या विचारांमध्ये आहे हे नक्की!

हेही वाचा : गांधींना अपेक्षित शिक्षणव्यवस्था आणि आजची शिक्षणव्यवस्था

ABOUT THE AUTHOR

...view details