'केवळ आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी त्यांनी ते वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत. आपल्या देशात घुसखोरी सुरू आहे. त्या सीमा बंद करता आल्या नाहीयेत. मात्र, महाराष्ट्रातला माणूस 1 नोव्हेंबरला कर्नाटकात जाऊ दिला जात नाही. याचा सुद्धा निषेध. कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये', असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी काल 'बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे आणि चंद्र-सूर्य असेपर्यंत तो कर्नाटकातच राहील,' असे म्हटले होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद : तणावाचे वातावरण, पोलिसांवर दडपशाहीचा आरोप - Maharashtra-Karnataka border dispute
14:22 November 01
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य बालिश - उदय सामंत
13:02 November 01
बेळगाव सीमाप्रश्न 'जैसे थे'; 65 वर्षांपासून मराठी माणसांवर सातत्याने अन्याय - शिवसेना
गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमाप्रश्न 'जैसे थे' आहे. याठिकाणी 65 वर्षांपासून मराठी माणसांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यामुळे आम्ही केंद्रातील भाजपा सरकारचा आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहोत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बेळगावचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करावा, यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.
13:01 November 01
बेळगावसहित मराठी भाषिक असलेली 800 गावे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे - चंद्रकांत पाटील
ज्या गावात कन्नड भाषकांची संख्या सर्वाधिक आहे ती गावे स्वाभाविकपणे कर्नाटक राज्यामध्ये गेली आहेत. मात्र, बेळगावसहित 800 गावे अशी आहेत, ज्या गावांत मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. इतक्या वर्षानंतरही या गावातील नागरिकांची महाराष्ट्रात येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गावे महाराष्ट्राला मिळालीच पाहिजेत, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदवीधर मतदारसंघ नोंदणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते.
12:55 November 01
मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होणार - जयंत पाटील
महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला जातो आहे. आज काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला, असे जलसंपदा विभाग मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
12:55 November 01
चिमुकल्यांनी सुद्धा हाती घेतले काळे झेंडे
अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी मराठी भाषिक काळे कपडे परिधानकरून व हातात काळे झेंडे घेत रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनीही कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे.
12:54 November 01
बेळगावसह ग्रामीण भागात सुद्धा निषेध
ग्रामीण भागात व वार्डा-वार्डात, मर्यादित वेळेत, सर्व नियम पाळत निषेध व्यक्त करावा असे समितीने आवाहन केले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मराठी भाषिक आपला निषेध व्यक्त करत आहेत. शिवाय संवेदनशील भागात दैनंदिन व्यवहारात अडथळा येणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आली आहे.
12:52 November 01
शिवसैनिकांनाही निषेध व्यक्त करण्यास अटकाव
निषेध व्यक्त करण्यासाठी बेळगावमधील शिवसेना कार्यालयात काळे शर्ट परिधान करून आलेल्या शिवसैनिकांनासुद्धा पोलिसांनी विरोध केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसैनिक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
12:51 November 01
मराठा मंदिराला पोलीस छावणीचे स्वरूप
मराठी भाषिकांना नेहमीच कायद्याची बंधने पाळत लढा द्यावा लागतो. कोणतेही उग्र आंदोलन न करता सर्व निर्बंध पाळत मराठी भाषिकांनी आजपर्यंत लढा दिला आहे. दरवर्षी काळ्या फिती लावून निषेध फेरी काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही उग्र आंदोलन न करता हरताळ पाळत व शक्य असेल तिथेच, नियमांचे पालन करत गटागटाने, प्रार्थना, संवाद व चर्चा सत्र आयोजित करून आपला निषेध नोंदवण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीककरण समितीने केले होते. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी मराठी भाषिक निषेध व्यक्त करत आहेत. समितीच्या मराठा मंदिर परिसराला सध्या पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
12:46 November 01
कर्नाटक सरकारकडून मराठी जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - महाराष्ट्र एकीकरण समिती
कोल्हापूर - 'अनेक वर्षे अन्यायाविरोधात लढणार्या मराठी जनतेचा वर्षीही कर्नाटक सरकारकडून आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सकाळपासून बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काळे झेंडे लावण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची यावर्षी सुदधा दडपशाही पाहायला मिळत आहे,' असे महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हटले आहे. तरीही समितीकडून निषेध व्यक्त करण्याच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे.
11:46 November 01
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेदरम्यान बेळगाव कर्नाटक राज्यात समाविष्ट झाले. या भागात मराठी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या भूभागावर महाराष्ट्राने हक्क सांगितला. मात्र, हा भूभाग महाराष्ट्राला मिळाला नाही. त्यामुळे या सीमावर्ती भागामध्ये नेहमीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतो. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. यंदाही या भागात तणावाचे वातावरण आहे.