मुंबई- काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ३ सदस्यीय कमिटी बनवण्याचाही प्रस्ताव दिला आहे.
मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिला राजीनामा - मिलिंद देवरा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेतील पराभवाची वैयक्तीक जबाबदारी घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कोणत्याही नेत्याने समोर येऊन राजीनामा दिला नाही, असे एका बैठकीत म्हटले होते. यानंतर, देशभरातून अनेक काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. आज मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला आहे.
मिलिंद देवरा माजी केंद्रीय राज्यमंत्री होते. लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी २५ मार्चला देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. याआधी संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. निरुपम यांना अचानक हटवत देवरा यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. देवरा यांनी दक्षिण मुंबई येथून निवडणूक लढवली होती. परंतु, शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून १ लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता.