महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पुढे; फडणवीस सरकारच्या काळातील आकडेवारी जाहीर - महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या आकडेवारी

देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक या महाराष्ट्रात झाल्या. राज्यात २०१९ साली ३,९२७ शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केली होती. २०१८च्या तुलनेत (३,५९४) २०१९मध्ये अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे...

Maharashtra and Karnataka top list of states with maximum suicide by farmers: NCRB data
शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पुढे; फडणवीस सरकारच्या काळातील आकडेवारी जाहीर

By

Published : Sep 3, 2020, 6:54 AM IST

नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य देशात सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे. २०१९मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालात समोर आले आहे. यासोबतच, देशातील सरासरी शेतकरी आत्महत्यांचा दर कमी झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मणिपूर, चंदिगड, दमण आणि दीव, दिल्ली, लक्षद्वीप आणि पद्दुचेरी या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी आत्महत्यांची एकही नोंद झाली नाही. यासोबतच, एकाही शेतकामगाराच्या मृत्यूची नोंद या ठिकाणी नसल्याचे या अहवालात समोर आले आहे.

याबाबत बोलताना सीपीआय (एम) नेते आणि ऑल इंडिया किसान सभेचे सचिव हन्नन मोल्ला यांनी मात्र हा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली नाही याचाच अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र, सरकार याची दखलही घेण्यास तयार नाही. हा सरकारचा शेतकरी विरोधी अजेंडा आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

२०१९मध्ये कृषीक्षेत्रातील १०,२८१ लोकांनी आत्महत्या केली. यामध्ये ५,९५७ शेतकरी आणि ४,३२४ शेतमजूर होते, अशी माहिती या अहवालात दिली आहे. यावर्षी देशभरात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी (१,३९,१२३) ७.४ टक्के आत्महत्या कृषीक्षेत्रातील होत्या. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ५,५६३ हे पुरुष तर ३९४ महिला होत्या. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली १०,३४९ तर २०१७ला १०,६५५ कृषीक्षेत्राशी निगडीत लोकांनी आत्महत्या केली होती. या तुलनेत २०१९च्या आकडेवारीमध्ये घट दिसून आली.

"आम्ही केवळ आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या व्यवसायाबाबत माहिती देतो, आत्महत्येचे कारण काय होते याबाबत आम्ही माहिती देत नाही" असे एनसीआरबीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सर्वात पुढे..

देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक या महाराष्ट्रात झाल्या. राज्यात २०१९साली ३,९२७ शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केली होती. २०१८च्या तुलनेत (३,५९४) २०१९मध्ये अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.

दरम्यान, गुजरातमध्ये कृषीक्षेत्राशी निगडीत झालेल्या ११८ आत्महत्यांपैकी दोन शेतकरी होते, तर बाकी सर्व शेतमजूर होते. तामिळनाडूमध्ये झालेल्या ४२७ आत्महत्यांपैकी सहा शेतकरी होते, तर बाकी शेतमजूर होते. केरळमध्ये झालेल्या १५० आत्महत्यांपैकी १२८ शेतमजूर होते, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details