मुंबई - मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती विजया के ताहिलरामानी यांचा मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबाबत विजया के ताहिलरमाणी यांनी विनंती अर्ज केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर काही दिवसांनी न्या. विजया यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. तसेच या राजीनाम्याची एक प्रत त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना देखील पाठविल्याची माहिती आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती न्या. विजया यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करून एक प्रकारे त्यांची पदावनती केली आहे. त्यामुळे न्या. विजया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विजया यांच्या उज्ज्वल कारकीर्दीस मुंबई उच्च न्यायालयापासून आरंभ झाला, जाणून घेऊया त्यांच्या कारकीर्दीची ही पार्श्वभूमी...
मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील नळगीर गावच्या विजया कापसे-ताहिलरमाणी यांचे वडील एल. व्ही. कापसे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक तसेच नामांकित वकील होते. त्यांचाच वारसा विजया यांनी पुढे चालवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक होण्यापूर्वी त्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील होत्या. ९०च्या दशकात गाजलेल्या अनेक प्रकरणांत त्या सरकारची बाजू मांडत होत्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद इकबाल मेमन उर्फ इकबाल मिर्चीच्या खटल्यात त्यांनी सरकारची बाजू मांडली होती. उल्हासनगरच्या रिंकू पाटील हत्या प्रकरणातही त्यांनी आरोपींना शिक्षा देण्यासाठी आपले कसब पणाला लावले होते.