भोपाळ- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप पिछाडीवर गेल्यावरून टीका केली आहे. भाजपला बहुमत मिळाले नाही, लोकांनी भाजपला नाकारलं, हे पक्षाने मान्य करायला हवे. आता भाजप अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षांबरोबर जुगाड करुन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल, पण हा जुगाड जनता विसरणार नाही, अशी खरमरीत टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली.
हेही वाचा -कर्नाटकचे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमारांना अवैध संपत्तीप्रकरणी जामीन मंजूर
विधानसभेत ७५ जागा जिकंणार असल्याच्या घोषणा देणाऱ्या भाजप पक्षाला बहुमतासाठी लागणाऱ्या ४६ जागाही मिळवता आल्या नाहीत. मागील काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या दहाही जागा जिंकल्यानंतर विधानसभेवेळी भाजपने राज्यात विरोधक उरला नसल्याचा प्रचार केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. तर नव्याने स्थापन झालेल्या जननायक जनता पक्षाने (जेजेपी) १० जागा मिळवत सर्वांना धक्का दिला. त्यामुळे जेजेपी पक्ष सत्ता स्थापेमध्ये निर्णायक भूमिका निभावणार असे चित्र दिसत आहे. तसेच इतर ८ जागा इतर छोट्या पक्षाचे उमेदवार आणि अपक्षांना मिळाल्या आहेत.
हेही वाचा -Haryana vidhan sabha:हरियाणामध्ये त्रिशंकू परिस्थिती, जेजेपी ठरणार 'किंगमेकर'?
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली दरबारी खेटे घालायला सुरवात केली आहे. भाजप सत्ता स्थापनेसाठी जेजेपी किंवा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज(शुक्रवारी) सकाळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. हरियाणा भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांनी अपक्ष उमेदवार भाजपमध्ये आल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुडा यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून सरकार स्थापन करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे हरियाणात घोडेबाजार होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.