भोपाळ-मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार आज सकाळी 11 वाजता होणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपाकडून शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. जवळपास 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये जोतिरादित्य सींदिया यांच्या 4 समर्थकांना मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती सींदिया यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.
राज्यपाल आनंदीबेन पटेल नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. आनंदीबेन पटेल या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन हे आजारी असल्यामुळे पटेल यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. आनंदीबेन पटेल यांनी एका दिवसापूर्वीच मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. चौहान यांनी मंथन केल्यानंतर अमृत हाती येते आणि विष भगवान शंकर ग्रहण करतात, असे वक्तव्य केले. यावरुन मंत्रीमंडळ विस्तार करणे चौहान यांच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती, असे स्पष्ट होते. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे बुधवारी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी दाखल झाले आहेत, असे भाजपा सूत्रांनी सांगितले.