तिरुवनंतपूरम - देशभरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून देशात गणपतीची अनेक प्राचीन मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. केरळमधील कासारगोड येथे मधुरवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर बांधण्यात आलेले 'मधूर मधानंदेश्वरा सिद्धिविनायक' मंदिर हे अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील गणपती बाप्पाची मूर्ती स्वयंभू असल्याचे म्हटले जाते. या मंदिरातील बाप्पाला 'मधुर महागणपती' असेही म्हटले जाते.
जाणून घ्या मधुरवाहिनी नदीच्या तटावरील 'मधुर मधानंदेश्वरा सिद्धिविनायक' मंदिराविषयी! मधुर मधानंदेश्वरा सिद्धिविनायक मंदिरात शिवलिंग आहे. तसेच येथे पंच पांडवांच्या मूर्ती देखील आहेत. या मुर्त्याच हे मंदिर 5 वर्ष जुने असल्याचे संकेत आहेत, असे म्हटले जाते. मधुवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर असून दहाव्या शताब्दीमध्ये बांधलेलं असल्याची माहिती आहे. मधूर महागणपती मंदिर केरळमधील कासारगोडपासून सुमारे 7 कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरामध्ये 'मुदप्पा सेवा' नावाचा खास उत्सव साजरा केला जातो.
मंदिराची वास्तू ही मालाबार प्रदेशातील काही लोकप्रिय मंदिरांसारखी आहे. मंदिराच्या भिंतीवर जटिल कोरीवकामाने सुशोभीत आहेत. मंदिराचे नूतनीकरण करताना मंदिर व्यवस्थापनाने मूळ रचनेत काहीही बदललेले नाही. तसेच मंदिराच्या अगदी जवळच सुंदर तलाव बांधलेला आहे. तलावातील पवित्र पाणी औषधीय गुणांनी परिपूर्ण असल्याचे म्हटले जाते. या पाण्याने त्वचेचे आजार बरे होतात, अशी मान्यता आहे.
मलबार आक्रमण दरम्यान टिपूची मंदिरावर हल्ला करण्याची योजना होती. त्याने आपली तलवार मंदिराच्या छतावर आदळली. त्या तलवारीवर कट चिन्ह अजूनही असल्याचे म्हटले जाते. टिपूने मंदिरातील तलावातील पाणी पिल्यानंतर त्यांने मंदिर उद्धवस्त करण्याची योजना सोडून दिली आणि तलावाचे नूतनीकरण केले, अशी लोककथा आहे.
मैप्पदी राजाच्या काळात हे मंदिर बांधले गेले होते. माधारू नावाच्या स्त्रीला शिवलिंग मिळालं आणि तिने मंदिरात शिवलिगांची स्थापना केली, असे म्हटले जाते. काही काळानंतर हे ठिकाण मधुर म्हणून ओळखले जाऊ लागले. मधुर मधानंदेश्वरा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. तसेच जागतिक स्तरावरील पर्यटकही या मंदिराचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी आवर्जुन येत असतात.