नवी दिल्ली -सध्या परतीच्या मान्सूनने काही राज्यात धुमाकूळ घातला आहे. अरबी समुद्रात आज(शनिवार) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मात्र, हा कमी दाबाचा पट्टा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दुर जात असल्याचे भारताच्या हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरील वादळाचा धोका टळला आहे.
हा कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तासांत आणखी पश्चिमेकडे म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दुर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वादळाचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. मात्र, मच्छिमारांना मध्य आणि उत्तर अरबी समुद्रात मासेमारीला जाण्यापासून सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासात गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.