प्रयागराज- देशभरामध्ये गेल्या १५ दिवसांपासून कोरोनामुळे बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे देशभरातून एक दिलासादायक वातावरण दिसून येत आहे. मात्र, याचा परिणाम औषध विक्री व्यवसायावर दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक म्हणून कोरोना कीट, फेसमास्क, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, थर्मामीटर यासह काही औषधांचा साठा मेडिकल चालकांनी करून ठेवला होता. मात्र, सध्या मागणी घटल्याने हे विक्रेते अडचणीत आले आहेत.
कोरोना रुग्ण वाढीचा टक्का घटला; औषधालये मात्र सलायनवर मुदत केवळ तीन ते सहा माहिने-
कोरोनाचा प्रसार वाढतच जात होता. त्यामुळे या औषध विक्रेत्यांनी संबधित औषधे आणि कोरोना किटमध्ये भांडवल गुंतवून ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता मागणी घटली आहे. त्यातील काही औषधांचा परतावाही मिळत नाही, आणि त्यांची मुदत केवळ तीन ते सहा माहिने आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने या औषध विक्रेत्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होणार आहे.
सरकारने आदेश काढावा-
कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण घटने ही दिलासादायक बाब असली तरी संभाव्य आर्थिक संकट टाळण्यासाठी औषध विक्रेत्यांनी आता केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहेत, की. ज्या औषधे परत करता येणार नाहीत, अशी औषधे संबंधित कंपन्यांनी परत घेण्यासंदर्भात सरकारने आदेश काढावा. या औषधामध्ये काही गोळ्या अशा आहेत की, कंपनी त्या माघारी घ्यायला तयार नाही, आणि त्याच्या किमतीही महाग आहेत. त्यामुळे औषध विक्रत्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचा साठा-
मार्च महिन्यात कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा औषध आणि साहित्याचा तुटवडा होता. त्यानंतर मागणी वाढत गेल्याने औषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची खरेदी करण्यात आली. त्यात काही महागड्या औषधाोंचा ही समावेश होता. मात्र, आता या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागल्याने ते साहित्य पडून राहू लागले आहे. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होणार आहे.