नवी दिल्ली - केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत असतात. काल संसदेतील कामात लक्ष नसल्यामुळे त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा प्रकरा घडला.
दानवे कामावर लक्ष द्या... लोकसभा अध्यक्षांनी झापलं..! - danve viral news
दानवेंना इंग्रजी भाषेत विचारलेला प्रश्न त्यांना कळला नसल्याने त्यांनी प्रश्न पुन्हा विचारण्याची अध्यक्षांकडे विनंती केली. त्यावरून संतापलेल्या अध्यक्षांनी दानवेंना सदस्य प्रश्न विचारत असताना लक्ष देत जा, असे खडसावले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एनडीए सरकारमधून बाहेर पडलेले शिवेसनेचे खासदार विरोधी बाकांवर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे सदस्यही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी सोडत नाही. अशातच प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दानवेंना त्यांच्या खात्यासंबंधी प्रश्न विचारले. त्यांचे एकून तीन प्रश्न पटलावर होते. दानवेंना प्रश्न विचारताना गोडसेंनी इंग्रजी भाषेतून विचारल्यामुळे दानवेंचा गोंधळ उडाला. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांकडे सदस्याने प्रश्न पुन्हा विचारावा, अशी विनंती केली. त्यावर अध्यक्षांनी संताप व्यक्त करत दानवेंना चांगलेच झापले. सदस्य प्रश्न विचारत असताना कामावर लक्ष देत जा, असे म्हणून त्यांची विनंती फेटाळून लावत गोडसेंना प्रश्न पुन्हा न विचारण्याची सूचना केली व तो प्रश्न नंतर विचारा असे आदेश दिले. त्यामुळे खासदार गोडसेंना दुसरा प्रश्न विचारावा लागला. लोकसभा अध्यक्षांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दानवे चांगलेच गडबडले. त्यामुळे गोडसेंनी विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना द्यावे लागले.
एकंदरीत रावसाहेब दानवेंना सभागृहात सजग न राहण्यामुळे अध्यक्षांनी चांगलाच झटका दिला. अध्यक्षांनी अशा सक्त शब्दात खडसावल्यामुळे दानवेंना चांगालच धडा मिळाला. लोकसभा अध्यक्षांचे आजचे रूप पाहता यानंतर दोन्ही बाजूचे सदस्य आणि मंत्रीसुद्धा चोख काम करतील, व लोकांच्या पैशांवर चालणाऱ्या या सर्वोच्च सभागृहात गांभीर्याने चर्चा होतील, अशी आशा आहे.