नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती राबर्ट वाड्रा लोकसभा निवडणुकांसाठी देशभर काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. केवळ राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी प्रचार करणार नसून संपूर्ण पक्षासाठी देशभर प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले. या बातमीनंतर 'रॉबर्ट वाड्रा प्रचार तर करणार. पण फायदा होणार कोणाला? काँग्रेसला की भाजपला?' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी वाड्रा यांची खिल्ली उडवली.
याआधी फेब्रुवारीमध्ये वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. यानंतर गाझियाबादमध्ये 'गाझियाबाद करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अबकी बार' असे त्यांच्या समर्थनार्थ पोस्टरही लागले होते. मात्र, आता रॉबर्ट वाड्रांनी काँग्रेसच्या प्रचारात सहभाग घेतला, तर ते भाजपच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे. सध्या अवैध संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. अन्वेषण संस्थेने आरोपींनी पेट्रोलियम आणि संरक्षण व्यवहारांमध्ये लाच घेतल्याचाही दावा केला आहे.