दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - congress
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर निर्णय होईपर्यंत त्यांच्यावर लोकसभा निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 'आम्हाला या याचिकेत काहीही तथ्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही ती फेटाळत आहोत,' असे म्हटले आहे.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वावरून न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळली आहे. याचिकेत राहुल यांच्यावर कारवाईसह त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी करण्यात आली होती. याचिकेत त्यांनी स्वेच्छेने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याचे म्हटले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 'आम्हाला या याचिकेत काहीही तथ्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही ती फेटाळत आहोत,' असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर निर्णय होईपर्यंत त्यांच्यावर लोकसभा निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी याचिका २ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर जय भगवान गोयल आणि सी. पी. त्यागी यांनी या याचिका दाखल केली होता. यावर पीठाने 'आम्ही ती याचिका पाहू,' असे म्हटले होते. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही राहुल यांच्यावर स्वेच्छेने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याचा आरोप केला होता.
गृह मंत्रालयाने नुकतेच राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या नागरिकत्वाविषयी करण्यात आलेल्या तक्रारीवरून प्रश्न उपस्थित केले होते. हा प्रकार स्पष्ट होईपर्यंत त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघांतून निवडणूक लढवत आहेत.