नवी दिल्ली - निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद समोर आले होते. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मोदी-शाह यांना आचारसंहिता भंग प्रकरणांमध्ये वारंवार क्लीन चिट मिळत असल्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना यावर पत्र लिहिले होते. 'तीन निवडणूक आयुक्तांचे वेगवेगळे मत असू शकते. मी चर्चेपासून दूर पळत नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते,' असे उत्तर अरोरा यांनी दिले आहे.
'मी चर्चा करण्यापासून कधीही दूर पळालो नाही. तीन निवडणूक आयुक्तांचे वेगवेगळे मत असू शकते. मात्र, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. निवडणुकीदरम्यान समोर आलेल्या विविध मुद्द्यांसाठी समिती तयार केली जाईल. निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कार्यप्रणालीत चाललेल्या बाबी मीडियात येत आहेत. जेव्हा गरज असते, तेव्हा मी व्यक्तिगतरीत्या चर्चेपासून दूर पळत नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते,' असे उत्तर अरोरा यांनी दिले आहे.'निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांचे एकमत असले पाहिजे, अशी अपेक्षा नसते. याआधीही अनेकदा वेगवेगळ्या आयुक्तांच्या विचारांमध्ये कमालीची भिन्नता असल्याचे समोर आले आहे. असे असणे योग्यच आहे. मात्र अशी मतभिन्नता त्या संबंधित आयुक्तांच्या सेवामुक्त होईपर्यंत ती आयोगादरम्यानच राहते. ती चव्हाट्यावर येत नाही,' असे अरोरा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?निवडणूक आयुक्त अशोक लवासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना आचार संहिता उल्लंघन प्रकरणी वारंवार क्लीन चिट मिळाल्यामुळे नाराज आहेत. यावर त्यांनी असहमती दर्शविली आणि आयोगाच्या बैठकींना जाणे ४ मेपासून बंद केले होते. त्यांनी अलीकडेच निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यांची असहमती जोपर्यंत रेकॉर्डवर आणली जाणार नाही, तोपर्यंत कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.