नवी दिल्ली-राहुल गांधींनी देशातील बलात्काराच्या घटनांवरून केलेल्या वक्तव्यावरून संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उतरले होते. मात्र, सभागृहात गदारोळ सुरू होताच लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेचे कामकाज सुरू होऊन बंद झाले आहे. दरम्यान राज्यसभेचे कामकाज सुरू झाले आहे.
राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि झारखंडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज लोकसभेत उमटले. वायनाडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी आहे, असे म्हटले होते. तर झारखंडमध्ये त्यांनी भारत 'मेक इन इंडिया' नाही तर रेप इन इंडिया झाला आहे, असे वक्तव्य केले होते. उत्तरप्रदेशात भाजपचा आमदार बलात्कार करतो, त्यानंतर पीडितेचा अपघात होतो. मात्र, मोदी यावर काहीही बोलत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते.
नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ. मात्र, मोदी हे सांगत नाहीत की, बेटींचा कोणापासून बचाव करायचा आहे. तर देशातील मुलींचा भाजपच्या आमदारांपासून बचाव करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या वक्तव्याचे डीमकेच्या खासदार कनिमोझी यांनी समर्थन केले. मोदी मेक इन इंडिया म्हणतात. त्याचा आम्ही आदर करतो. मात्र, आता देशात जे घडत आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधीनी केला. दुर्दैवाने 'मेक इन इंडिया' यशस्वी होत नसून देशातील महिलांवर बलात्कार होत आहेत. ही चिंतेची बाब आहे, असे कनिमोझी म्हणाल्या.
राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया
राहुल गांधींनी संसदेचीच नव्हे तर संपूर्ण देशाची माफी मागावी