नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६० हजारांच्या पुढे गेला आहे. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. तर ४० पेक्षा जास्त दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. अर्थव्यवस्थाही कमकुवत होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (सोमवार) ३ वाजता सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनमधुन बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना राबवाव्यात यासंबंधी चर्चा होणार आहे. तसेच राज्यांतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवरून दिली आहे. लॉकडाऊन झाल्यापासून पंतप्रधान मोदी पाचव्यांदा पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी उद्योगधंदे सुरू करण्यात येणार असून कन्टेन्मेंट भागात कोरोनाला कसा आवर घालायचा यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.