बाडमेर - जिल्ह्यातील जसोल गावात रविवारी श्री राम कथा सुरू असताना मंडप कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० जण जखमी झाले. राम कथा सुरू असताना जोरदार वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. या घटनेचा लाईव्ह व्हिडियो समोर आला आहे. यात कथावाचक 'पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढलाय. कथा थांबवावी लागेल. पळा, पळा... मंडप उडतोय. लोकांना बाहेर काढा. मंडप रिकामा करा. मंडप उडतोय... निघा निघा...' असा धोक्याचा इशारा भाविकांना देताना दिसत आहे. यानंतर कथावाचकानेही येथून त्वरेने काढता पाय घेतल्याचे व्हिडियोत दिसत आहे.
जिल्ह्यातील बालोतरा येथील जसोल गावात ही दुर्घटना घडली. येथे राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मोठ्या संख्येने वृद्ध, महिला आणि लहान मुले आली होती. अचानक वातावरण बदलले. जोरदार वारा आणि पावसाला सुरुवात झाली. कथावाचक यादरम्यान इकडे-तिकडे पहात म्हणाले, 'पाहा.. वारा आणि पाऊस वाढला आहे. कथावाचन थांबवावे लागेल. बघा..बघा मंडप उडतोय. बाहेर पडा, मंडप रिकामा करा...' यामुळे लोकांमध्ये एकदम पळापळ झाली. कथावाचकही लगबगीने उठून निघाले.