भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजकारणात मंगळवारी राजकिय भूकंप पाहायला मिळाला. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ १९ समर्थक आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार संकटात सापडले आहे. अशातच काँग्रेसचे आमदार बुधवारी (११ मार्च) जयपूरला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Live Update :
1.51 am मार्च ११ -
- भाजपचे आमदार दिल्लीत दाखल
- 'आम्ही येथे सुट्टीसाठी आलो असून उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहे' - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गिय यांची प्रतिक्रिया
00.33 मार्च ११ -
- आमदारांना घेऊन विशेष विमान रवाना
- आमदारांसह प्रदेश अध्यक्ष वी.डी. शर्मा यांचाही समावेश
- सुहास भगत आणि आशुतोष तिवारी देखील रवाना
- भूपेंद्र सिंग आणि रामपाल यांचाही समावेश
- काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना छत्तीसगड किंवा राजस्थान येथे हलवणार असल्याची शक्यता
ज्योतिरादित्य सिंधिया आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. मात्र, त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. दिल्लीऐवजी ते आता भोपाळमध्येच १२ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. त्यानंतर भाजपच्या कार्यालयासमोर ५ ट्रॅव्हल्सही लागल्या होत्या. त्यामुळे भाजप आपल्या आमदारांना दुसऱ्या राज्यात पाठवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी झालेल्या या राजकिय घडामोडींमुळे चिंता करण्याचे कारण नाही, आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. तसेच, आमचे सरकार हे पाच वर्ष टिकून राहील, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान काँग्रेसचे नेते साजन सिंग आणि डॉ. गोविंद सिंग हे बंगळूरु येथून निघाले आहेत. ते आपल्या १९ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना भेटून पक्षात परतण्यासाठी चर्चा करणार आहेत.