नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी रात्री लॉकडाऊन २.०ची नियमावली जाहीर केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासीयांना संबोधित केले.
अनलॉक २.०ची घोषणा, गरीब कल्याण योजनेचा दिला हिशेब; चीनबाबत मौनच!
16:05 June 30
अनलॉक २.०ची घोषणा, गरीब कल्याण योजनेचा दिला हिशेब; चीनबाबत मौनच!
लॉकडाऊन १.० नंतर लोक निष्काळजी झाले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या गोष्टी लोक आधी जेवढ्या गांभीर्याने करत होते, तेवढ्या गांभीर्याने आता करत नाहीत. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर लोकांनी संसर्गजन्य रोगांपासून अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत राहणार सुरू..
प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत आपण १.७५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. याद्वारे गेल्या तीन महिन्यांमध्ये, २० कोटी गरीब कुटुंबीयांच्या जनधन खात्यांमध्ये ३१ हजार कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आले. तसेच, ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. यापुढे शेतीच्या कामांना तसेच, वेगवेगळ्या सणांना सुरुवात होते. त्यामुळेच, ही योजना पुढे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी सुमारे ९० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे पंतप्रधानांनी जाहीर केले.
दरम्यान, कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कोणत्या उपययोजना करण्यात येत आहेत याबाबत मोदींनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच, भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काही स्पष्टीकरण वा अधिक माहिती देतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, याबाबतही पंतप्रधानांनी मौन धारण केले.