चेन्नई -अमेरिकेच्या १३ कृत्रीम लघु-उपग्रहांसह अर्थ इमेजिंग अँड मॅपिंग उपग्रह 'कॅर्टोसॅट - ३' या उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज (बुधवार) सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी, 'पीएसएलव्ही - सी ४७' या अवकाशयानामार्फत प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर, ९ वाजून ५५ मिनिटांनी सर्व १४ उपग्रहांना यशस्वीपणे त्यांच्या कक्षेमध्ये सोडण्यात आले.
'पीएसएलव्ही - सी ४७'चे उड्डाण हे पीएसएलव्हीच्या 'एक्सएल' प्रकारातील यानाचे हे २१ वे उड्डाण होते. यामध्ये कॅर्टोसॅट -३ या मुख्य उपग्रहासोबतच, अमेरिकेचे १३ लघु-उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
कॅर्टोसॅट -३ हा इमेजिंग अँड मॅपिंग करणाऱ्या उपग्रहांमधील अधिक प्रगत आणि वेगवान उपग्रह आहे. तब्बल १,६२५ किलो वजनाच्या या उपग्रहाद्वारे पृथ्वीची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे मिळण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणावर शहरी नियोजन, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे, तसेच किनारपट्टीचा योग्य वापर करण्यासाठी या उपग्रहाची मदत होईल. या उपग्रहाच्या कामकाजाचा कालावधी पाच वर्षे असणार आहे.
तर अमेरिकेच्या १३ लघु उपग्रहांमध्ये, १२ फ्लॉक-४ पी (FLOCK-4P), आणि एक 'मेशबेड (MESHBED)' असणार आहे. फ्लॉक- ४पी या उपग्रहांचे काम पृथ्वीचे निरिक्षण आणि नोंद करणे असणार आहे. तर, मेशबेडचे काम कम्युनिकेशन चाचणी करणे असणार आहे.
हेही वाचा :संविधान दिवस : संविधान निर्मितीसाठी २ वर्ष ११ महिने १८ दिवसांचा कालखंड, जाणून घ्या घटनाक्रम