पटना -बिहारमधील पूरपरिस्थिती आणखी गंभीर झाली असून नेपाळमधून राज्यात वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराच्या धोक्याने प्रभावित झालेल्यांची संख्या वाढली असून हा आकडा जवळपास 66.60 लाखांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील एकूण 16 जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर बिहारच्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली असून दरभंगा जिल्ह्यातील गावांनादेखील भेट दिली आहे. पुरामुळे जीव गमावलेल्यांची संख्या 19 असून काही संपर्क तुटलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. पूरग्रस्तांची संख्या मंगळवारपासून तीन लाखांपर्यंत वाढली आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे 1 हजार 165 ग्रामपंचायतींना फटका बसला आहे. हा आकडा आणखी 13 ने वाढलाय.