नवी दिल्ली -राजधानीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा फटका दुकानदारांनाही बसत आहे. आंदोलकांनी ईशान्य दिल्लीतील चाँद बाग परिसरातील एका दारूच्या दुकानातील बाटल्या लुटल्याची घटना घडली. हिंसाचारादरम्यान बाटल्या फोडण्यासाठी हे दुकान लुटण्यात आले. या प्रकारात 75 ते 80 लाखांचा मद्यसाठा लुटण्यात आला.
सोमवारी सायंकाळी अचानक काही लोकांनी दुकानात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी दुकानातील दारूच्या बाटल्या, दोन रेफ्रिजरेटर, स्कॅनर, टीव्ही आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड केली. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, घुसखोरांची संख्या जास्त असल्याने त्यांना अपयश आले, अशी माहिती दुकानाचे व्यवस्थापक राज कुमार यांनी दिली.