बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकांना मेणबत्त्या पेटवण्यास सांगितले आहे. असे करण्याने काय फायदा होईल याचे शास्त्रीय स्पष्टीकरण मोदींनी द्यावे, असे आव्हान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मोदींनी दिले आहे.
भाजप स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य..?
सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. याचेच औचित्य साधून त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला देशभरातील लोकांना दिवे लावण्यास तर नाही सांगितले ना? असा खोचक प्रश्न कुमारस्वामी यांनी विचारला. हे कारण वगळता आणखी कोणते कारण यामागे असू शकते? यामागे काही शास्त्रीय स्पष्टीकरण असल्यास पंतप्रधानांनी ते द्यावे, असे मी त्यांना आव्हान देतो. अशा आशयाचे ट्विट कुमारस्वामी यांनी केले.
देशातील डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत. तसेच कोरोनाच्या चाचण्याही सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध नाहीत. कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहेत हे सांगण्याऐवजी पंतप्रधान जनतेला निरर्थक उपक्रम सुचवत आहेत, असे ते म्हणाले.