श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी याबाबत घोषणा केली आहे. यापूर्वीच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आज कोणती तरी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काश्मीरमध्ये मोठ्या लष्करी फौजा उतरवण्यात आल्या आहेत. सर्वत्रच सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना पुढील सूचना मिळेपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर शहर व जिल्ह्यामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. श्रीनगरप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही १४४ कलम लागू करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. संचारबंदी मात्र लागू करण्यात आली नसल्याचा खुलासा जम्मू-काश्मीर सरकारने केला आहे.