26 डिसेंबर रोजी दिसणार 2019 या वर्षातील शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण - solar eclipse
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण महिनाअखेरीस म्हणजेच 26 डिसेंबर 2019 रोजी दिसणार आहे.
नवी दिल्ली - वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण महिनाअखेरीस म्हणजेच 26 डिसेंबर 2019 रोजी दिसणार आहे. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.
सूर्यग्रहण सकाळी 09:00 ते दुपारी 01:35 पर्यंत चालणार आहे. या शेवटच्या सूर्यग्रहणाचा वैज्ञानिक अभ्यास करणार असल्याची माहिती वैज्ञानिक दीपांकर बनर्जी यांनी दिली आहे. 10 वर्षांनंतर असे सूर्यग्रहण लागणार आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण असणार असून ही खगोलप्रेमींसाठी विशेष पर्वणी असणार आहे. ग्रहण सौदी अरेबिया, ओमान, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन, श्रीलंका, इंडोनेशिया या देशातही दिसणार आहे.
चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लंबवर्तुळाकार असल्याने, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही (कोनीय माप) बदलत असतो. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच, किंवा सूर्यबिंबाचा आरसा वापरून प्रतिबिंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते.